बांगलादेशच्या सर्वोच्च लष्करी गुप्तचर यंत्रणेने हितसंबंधियांच्या हातचे शस्त्र न बनता देशातील लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.
‘डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इण्टेलिजन्स’ (डीजीएफआय) या लष्करी यंत्रणेची बैठक बुधवारी ढाका कॅण्टोनमेण्ट येथे बुधवारी पार पडली. या बैठकीत शेख हसीना यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘डीजीएफआय’ या यंत्रणेचा वापर भूतकाळात शस्त्रासारखाच झाला, ही बाब दुर्दैवी असून आपल्याला या यंत्रणेचा वापर राजकीय स्तरावर करायचा नसून या यंत्रणेने आपला दर्जा उंचावत ठेवून एका राष्ट्रीय संस्थेप्रमाणे उभारणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन हसीना यांनी केले. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याकामी तुम्ही सदैव सज्ज असले पाहिजे, असे त्या पुढे म्हणाल्या.
‘डीजीएफआय’ ही अत्यंत प्रभावशाली यंत्रणा लष्कराकडून चालविली जाते. या यंत्रणेसमवेत शेख हसीना यांनी प्रथमच असा संवाद साधला. याआधी काही हिंतसंबंधियांनी बेकायदेशीररीत्या सत्ता बळकावून घेत सत्तेवर वर्चस्व मिळविण्यासाठी या यंत्रणेचा बेछूट वापर केला, असेही हसीना यांनी नमूद केले. यामुळे या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊन लोकांचा विश्वासही कमी झाला, असे त्या म्हणाल्या.