जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर बांग्लादेशने स्पष्ट भूमिका घेतली असून भारताला पाठिंबा दिला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवणे हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे असे बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रदेशात स्थिरता आणि शांतता राहिली पाहिजे तसेच विकासाला सर्व देशांचे प्रथम प्राधान्य असेल पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे असे बांग्लादेशने म्हटले आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतल्यानंतर आठवडयाभराने बांग्लादेशने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्रानेही भारत-पाकिस्तानने या प्रश्नावर तोडगा काढावा असे सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या मते काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे.

रशिया, मालदीव, अफगाणिस्तान, यूएई आणि श्रीलंका या देशांनी भारताच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवणे हा अंतर्गत विषय असल्याचे या देशांनी मान्य केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा पहिला बांग्लादेश दौरा आहे.