03 August 2020

News Flash

न्यूझीलंडमधील गोळीबारात थोडक्यात बचावले बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू

'सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र सर्वांना मानसिक धक्का बसला आहे'

न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.

‘सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र सर्वांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितलं आहे’, अशी माहिती जलाल यांनी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज तमिम इकबाल याने ट्विट केलं आहे की, ‘गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला आहे. अत्यंत भीतीदायक अनुभव होता. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा’.

ख्राईस्टचर्च येथील मशिदीत गोळीबार झाल्यानंतर अजून एका मशिदीत गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

हल्ल्यातून वाचल्यानंतर मुश्तफिकूर रहीम यानेही ट्विट करत अल्लाहचे आभार मानले आहेत. आम्ही खूपच सुदैवी असून पुन्हा असं काही पाहण्याची इच्छा नाही असं त्याने म्हटलं आहे. बांगलादेशमधील डेली स्टारचे पत्रकार मझहर उद्दीन संघासोबत प्रवास करत होते. त्यांनी सांगितलं की, संघ मशिदीत पोहोचला असता गोळीबार होत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यानंतर त्यांनी लगेच बसमध्ये प्रवेश केला आणि सूचनेप्रमाणे खाली जमिनीवर झोपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2019 9:05 am

Web Title: bangladesh cricket team saved from firing new zeland
Next Stories
1 विश्वचषकाची तयारी.. परिपूर्ण की अपूर्ण?
2 विश्वचषकाच्या दृष्टीने ‘आयपीएल’चा ताण हाताळण्याची जबाबदारी खेळाडूंवर!
3 खेळ थांबायला नको!
Just Now!
X