सरकारबरोबरील मतभेदानंतर बांगलादेशाचे पहिले हिंदू सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. सिन्हा यांच्यावर मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता सारखे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक महिन्यांपासून ते सुटीवर होते. या काळात ते परेदशात गेले होते. सुटी संपताच त्यांनी सरकारकडे आपला राजीनामा सादर केला.

ऑस्ट्रेलियातून त्यांनी राष्ट्रपती अब्दुल हामिद यांच्याकडे राजीनामा पाठवला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात एका निकालात न्यायाधीशांवरील महाभियोगसंबंधीचे संसदेचे अधिकार संपुष्टात आणण्याचा निर्णय दिला होता. तेव्हापासून सातत्याने वाद सुरू झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच वरिष्ठ न्यायाधीशांनी सिन्हा यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करत त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

सिन्हा यांनी १७ जानेवारी २०१५ मध्ये बांगलादेशाचे २१ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्ष ३१ जानेवारी रोजी पूर्ण होणार होता. सिन्हा यांचा राजीनामा बांगलाभवनला (राष्ट्रपती भवन) मिळाला असल्याची माहिती राष्ट्रपतींचे माध्यम सचिव जैनुल आबिदीन यांनी दिली. परंतु, त्यांनी विस्तृत माहिती देण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याचा संसदेचा अधिकार रद्द करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे सरकार त्यांच्यावर नाराज होते. याच वादादरम्यान ते १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले होते.