बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मेमन यांनी आपला नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. सहाव्या ‘इंडियन ओशन डायलॉग’ व अकराव्या ‘दिल्ली डायलॉग’ या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ते  १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत  भारत दौऱ्यावर राहणार होते.  या अगोदर नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

परराष्ट्रमंत्री मेमन  हे आज (गुरूवार) तीन दिवसीय भारत दौऱ्यासाठी येणार होते. यानंतर उद्या शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ते दिल्लीतील सहाव्या ‘इंडियन ओशन डायलॉग’ या कार्यक्रमात सहभागी होणार होते. या कार्यक्रमात हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा होणार होती. शिवाय भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर देखील त्यांची चर्चा होणार होती.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे असे अब्दुल मेमन यांनी म्हटले होते. राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळताच मेमन यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. “भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एका सहिष्णू देश आहे. पण भारत त्या मार्गावरुन विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल” असे मेमन म्हणाले होते.

अल्पसंख्यांकांचा छळ करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश केल्याबद्दल अब्दुल मेमन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोमणा मारला होता. “बांगलादेश इतका जातीय सलोखा असलेले देश फार कमी आहेत. अमित शाह काही महिने बांगलादेशमध्ये राहिले तर, त्यांना आमच्या देशातील आदर्श स्थिती दिसेल” असे मेमन म्हणाले होते. शिवाय,“भारतामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांच्यामधल्य वादांची आम्ही चिंता करत नाही. पण एक मित्र म्हणून आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होईल असे भारत काही करणार नाही अशी अपेक्षा आहे” असे मेमन म्हणाले होते.