News Flash

बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला, ८० घरांची नासधूस

फेसबुक पोस्टमुळे झालेल्या वादातून केला हल्ला

(फोटो सौजन्य: twitter/taslimanasreen वरुन साभार)

बांग्लादेशमधील हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो समर्थकांनी बुधवारी शाल्ला उपजिल्हा येथील सुमानगंजमधील एका हिंदू गावावर हल्ला केला. सोमवारी या संघटनेच्या काही नेत्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी देण्यात आलेल्या भाषणामध्ये हल्ला झालेल्या गावातील एका व्यक्तीने फेसबुक पोस्टमधून एका धर्मगुरुंच्या वक्तव्याचा निषेध केल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर संतापलेल्या समर्थकांनी या गावावर हल्ला करुन येथील ८० घरांची नासधूस केलीय.

सोमवारी देराई उपजिल्हा येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे आमिर अल्लामा जुनैद बाबुनागुराई, व्यवस्थापकीय सह-सचिव मौलाना मुफ्ती मामुनुल हक आणि संघटनेच्या इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली. यावेळी बोलताना यावेळी मामुनुल हक यांनी आपल्या भाषणामध्ये नौगाव येथील एका हिंदू तरुणाने फेसबुकवर केलेल्या पोस्टचा उळ्लेख करत त्याने आपल्यावर टीका केल्याचं म्हटलं. बांगबंधुंच्या शिल्पावरुन मामुनुल हक यांनी मांडलेल्या मतावर या पोस्टमध्ये टीका करण्यात आलेली. याच भाषणानानंतर बुधवारी हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या हजारो समर्थकांनी या गावावर सशस्त्र हल्ला केला.

हिंदू व्यक्तीने केलेल्या पोस्टचा उल्लेख भाषणामध्ये करण्यात आल्यानंतर हिफाजतच्या स्थानिक नेत्यांनी मंगळावारी रात्रीपासूनच सुमानगंजमध्ये आंदोलन करुन निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. धार्मिक मुद्यावरुन हिंसा घडवण्याचा प्रयत्न या पोस्टच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप संघटनेनं केला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काशीपूर, नाचीन, चंदीपूर आणि इतर भागातील मुस्लीम समाजातील व्यक्तींनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नौगाववर हल्ला केला. येथील हिंदू वस्तीवर हल्ला करत त्यांनी अनेक घरांची नासधूर केली.

हबीबपूर युनियनचे अध्यक्ष असणाऱ्या विवेकानंद मुजूमदार बाकूल यांनी या गावातील अनेक घरांवर हल्ला झाल्याची माहिती दिल्याचं ‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या गावातील अनेक हिंदू कुटुंबांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाव सोडल्याचंही वृत्त आहे. अनेक हिंदूंनी गाव सोडल्यानंतर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या समर्थकांनी गावामध्ये अनेक घरांची तोडफोड केली असून घरातील वस्तू चोरल्याची माहितीही समोर आली आहे.

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मूळच्या बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “बांग्लादेशमधील इस्लामच्या सैनिकांनी आज सुमानगंजमधील एक हिंदू गाव उद्धवस्त केलं. तसं हे बांग्लादेशमध्ये फार दूर्मिळ चित्र नाही,” असा खोचक टोला नसरीन यांनी हल्लेखोरांचा फोटो ट्विट करत लगावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील ७० ते ८० घरांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 11:48 am

Web Title: bangladesh hefazat e islam followers attack hindu houses in sunamganj scsg 91
Next Stories
1 दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात
2 ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील महालात दरोडा
3 करोना संकटात भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी
Just Now!
X