बांगलादेशमधील कोमिला येथील हिंदू समुदायातील काही नागरिक फ्रान्सचे समर्थन करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र कट्टरपंथीयांनी फ्रान्सचे समर्थन करणाऱ्या या नागरिकांपैकी अनेकांच्या घरांची तोडफोड करुन, घरांना आग लागवल्याची घटना घडली आहे. एका स्थानिक हिंदू व्यक्तीने फ्रान्सचा विरोध करणाऱ्या फेसबुक पोस्टवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचा आरोप या कट्टरपंथीयांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. बांगलादेशमध्ये रोज फ्रान्सच्या विरोधात शेकडोच्या संख्येने लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत.

बांगलादेशमधील स्थानिक प्रसारमाध्यमांपैकी एक असणाऱ्या ढाका ट्रिब्यूनलने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी दुपारी कोमिला प्रांतातील येथील मुरादनगर जिल्ह्यातील कोरबनपुर गावामध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे येथील अल्पसंख्यंक हिंदू समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. जाळपोळ करणाऱ्यांनी स्थानिक यूनियन परिषदेचे अध्यक्ष बनकुमार शिव यांचे कार्यालय आणि विरोधी प्रतिक्रिया देणाऱ्या शंकर देबनाथच्या घराला आग लावली. त्याचबरोबर या भागातील दहा हिंदू कुटुंबियांवर या जमावाने हल्लाही केला.

घरांना लावलेली ही आग एवढी मोठी होती की ती विझवण्यासाठी आग्नीशामन दलाच्या गाड्यांची मदत घ्यावी लागली. या वृत्तानुसार संबंधित घटनेची माहिती मिळताच येथील बंगरा पोलीस स्थानकामधील पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी पोहचली. त्यानंतर कोमिलाचे उपायुक्त अबुल फजल मीर, पोलीस अधिक्षक सैय्यद नुरुल इस्लाम आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिकांच्या हवाल्याने ढाका ट्रिब्यूनलने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी गावातील शंकर देबनाथ याने फ्रान्ससंबंधित एका फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. या पोस्टमध्ये प्रेषित महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणाऱ्या फ्रान्सला विरोध करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. या पोस्टवर शंकरने प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे समर्थन केलं. तसेच पैगंबरांवरील व्यंगचित्र योग्य असल्याचं म्हटलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याचरप्रमाणे धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी पोलिसांनी शंकर देबनाथ आणि अनिक भौमिक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. कोमिलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डी. एस. बी. अजीमुल अहसन यांनी कोरबनपुर गावामध्ये स्थानिकांच्या एका गटाने स्थानीक संघ परिषदेचे अध्यक्ष बनकुमार शिव, शंकर देबनाथ यांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती दिली. तसेच अन्य हिंदू कुटुंबांच्या घरावरही हल्ला करण्यात आल्याचे अहसन म्हणाले.