बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार मश्रफी मोर्ताझाने राजकारणातही दणक्यात पर्दापण केले आहे. बांगलादेशच्या ११ व्या संसदीय निवडणुकीत मोर्ताझाने नरेल मतदारसंघातून मोठ्या अंतराने विजय मिळवला आहे. अवामी लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मोर्ताझाने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ३४ टक्के अधिक मते मिळवली.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोर्ताझाला अडीच लाख मते मिळाली आहेत. तर ओयक्या फ्रंट आघाडीचे फरिदुज्जामनान फरहाद यांना अवघे ८ हजार मते मिळाली. ‘नरेल एक्स्प्रेस’ नावाने मोर्ताझा प्रसिद्ध आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बांगलादेशातील जनतेची सेवा करायची इच्छा असून यासाठी राजकारण जाणेच चांगले आहे, असे ३५ वर्षीय मोर्ताझाने यापूर्वी म्हटले होते. शेख हसीना यांनाही त्याने शुभेच्छा दिल्या व संधी दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

दरम्यान, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. बांगलादेशातील डीबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ३०० पैकी २९९ जागांचे निकाल हाती आले आहेत. अवामी लीगने २६६ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.