बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी २६०० किलो आंबे पाठवले आहेत. आंब्याच्या २६० पेट्या भरून ट्रक बांगलादेशमधून भारतात पोहोचले आहेत. बांगलादेशमधील प्रसिद्ध अशा हरिभंगा जातीच्या आंब्याच्या या पेट्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातून बांगलादेशला होणारा लसींचा पुरवठा मंदावला आहे. त्यामुळे ही मँगो डिप्लोमसी अवलंबली असल्याची चर्चा आहे रंगपूर जिल्ह्यातील हरिभंगा जातीचे आंबे बेनापोल चेकपॉइंटवरून भारतात पोहोचले आहे. यावेळी सीमेवर बांगलादेशचे अधिकारी उपस्थित होते. दोन्ही देशातील संबंध आणखी चांगले होण्यासाठी ही भेट दिल्याचं बेनापोल कस्टम हाउसचे उपआयुक्त अनुपम चकना यांनी सांगितलं. हे आंब्याचे ट्रक कोलकातामधील बांगलादेशच्या हाय कमिशनकडे पोहोचले आहेत. आता येथून पुढे या पेट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बांगलादेश सीमेवर असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही या आंब्यांची रसद पोहोचणार आहे.

हरिभंगा जातीच्या आंब्यांमुळे रंगपूरची अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. या आंब्यामुळे ३० हजाराहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हंगामात या आंब्यांची किंमत ६० ते ८० बांगलादेशी टके प्रतिकिलो इतकी असते. जुलैच्या शेवटी या आंब्याचा प्रतिकिलो ३००-५०० टके इता होतो. दरवर्षी या आंब्यांमुळे १०० कोटी टकेंची उलाढाल होते.

गुरुग्राममध्ये नागालँडमधील दोघांचा संशयास्पद मृत्यू!, ICU मध्ये आइसक्रीम खाताच एअरहोस्टेसचं निधन

यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मँगो डिप्लोमसी अवलंबली होती. तेव्हा ममता दीदींनी हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग जातीचे आंबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वंकैय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिह आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठवले होते. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्याच्या पेट्या पाठवल्या होत्या.