ढाका : बांगलादेशात रविवारी शाळा सुरू करण्यात आल्या असून हजारो विद्यार्थी शाळेत परतले आहेत. करोनामळे ५४३ दिवस शाळा बंद होत्या. पण आता करोनाची परिस्थिती सुधारल्याने शाळा परत सुरू करण्यात आल्या आहेत तसेच लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे.

वृत्तवाहिन्यांनी विद्यार्थी त्यांच्या गणवेशात शाळेत उपस्थित असल्याचे दाखवले. मुलांच्या चेहऱ्यावर स्मित  हास्य होते. त्यांनी मुखपट्ट्या घातलेल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. अनेक मुले बराच काळ आधीच शाळेत येऊन बसली होती इतकी त्यांना शाळेची ओढ लागली होती. अनेक शाळांत शिक्षकांनी फुले व चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत केले. पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश देण्यात आला नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. शिक्षण मंत्री दिपू मोनी यांनी सांगितले की, सुरक्षा उपायांमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही. प्रत्येक इयत्तेचे वर्ग आठवड्यात सुरुवातीला एकदाच  होतील व आरोग्यविषयक नियम पाळले जातील. जर संसर्ग पुन्हा वाढेल असे दिसले तर ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात येतील.