बांगलादेशमध्ये मंगळवारी एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरुन त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. सुबर्ना नोदी (३२)असं या मृत महिला पत्रकाराचं नाव असून त्या बांगलादेशमधील आनंदा टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकार होत्या.

बांगलादेशची राजधानी ढाकापासून जवळपास 150 किमी लांब पबना जिल्ह्यातील राधानगर परिसरात राहत होत्या. 10 ते 12 अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले होते आणि रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी सुबर्णा यांच्या घराची बेल वाजवली. सुबर्णा यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती येथील पोलिस अधिकारी गौतम कुमार बिस्वास यांनी दिली.

सुबर्ना आपल्या ९ वर्षीय मुलीसह राहत होत्या, तर त्यांचा पतीसोबत घटस्फोटाचाही खटला सुरू होता, अशी माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी सुबर्ना यांना रुग्णालायात नेले होते मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुबर्ना यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पती आणि सासऱ्यावर संशय व्यक्त केला आहे.