मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची पाकिस्तानातील गोठवण्यात आलेली बँक खाती पुन्हा सुरु झाली आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाच्या पाच दहशतवाद्यांची पाकिस्तानाली बँकखाती पुन्हा सुरु झाली आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या मंजुरीनंतर हाफिज सईदचे बँक खाते पुन्हा सुरु झाले आहे. इंटरनॅशनल द न्यूजने हे वृत्त दिले आहे.

अब्दुल सलमान भुत्तावी, हाजी एम अश्रफ, याहया मुजाहिद आणि झफर इक्बाल या पाच दहशतवाद्यांची बँक खाती सुरु झाली आहेत. हे सर्व UNSC च्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये आहेत. दहशतवादाला पैसा पुरवल्याप्रकरणी हे सर्व सध्या लाहोरमधील तुरुंगात एक ते पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

पंजाब दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. कुटुंबाचे खर्च भागवण्यासाठी बँक खाते सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी या सर्व दहशतवाद्यांनी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली होती असे सूत्रांनी सांगितले. मागच्या महिन्यातच पाकिस्तान दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता. फक्त मुंबईच नव्हे, भारतात आतापर्यंत झालेल्या वेगवेगळया दहशतवादी हल्ल्यांमध्ये हाफीज सईदचा सहभाग आहे. त्यामुळे त्याचे बँक खाते पुन्हा सुरु होणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते.