दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EoW)  प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडिया आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. नीरा राडियांच्याविरोधात ३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. नीरा राडिया या नयाती हेल्थकेअरच्या अध्यक्षा आणि प्रवर्तक आहेत. टूजी प्रकरण आणि वादग्रस्त टेप प्रकरणामुळे त्या चर्चेत होत्या. यामध्ये ईओडब्ल्यूने दोन कंपन्यांविरोधात ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. इओडब्ल्यूच्या FIR नुसार गुरुग्रामच्या हेल्थ कंपनीसोबतच नारायणी इनव्हेस्टमेंट या कंपनीचंही नाव समोर आलं आहे. नयाती आणि नारायणी या दोन्ही कंपन्यांवर ३०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. द आऊटलुकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नयाती आणि नारायणी यांच्या गुरुग्राम आणि विमहंस या दिल्लीतील हॉस्पिटलमधील योजनांमधील योजनांमध्ये २०१८ ते २०२० दरम्यान ३१२.५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. दिल्लीचे ऑर्थोपेडिक सर्जन राजीव के शर्मा यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यंनी विविध प्रसिद्ध कंत्राटदारांच्या नावावर बनावट खाती उघडून कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यांमध्ये टाकली. या बँक कर्जांमधून कोट्यवधींचे गैरव्यवहार झाले आहेत.

कोण आहेत नीरा राडिया?
नीरा राडिया या प्रसिद्ध लॉबिस्ट आहेत. नीरा राडिया अवघ्या १५ वर्षांमध्ये अब्जाधीश झाल्या. २ जी घोटाळ्यासह अनेक महत्वाच्या घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव पुढे आलं आहे.