स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना पुन्हा एकदा आपलं खातं क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा खात्याशी संबंधित कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करु नये अशी सूचना केली आहे. तसं केल्यास होणाऱ्या नुकसानासाठी बँक जबाबदार राहणार नाही असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. बँकेच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका खातेधारकाने आपला बचत खातं क्रमांक तसंच इतर महत्त्वाची कागदपत्रं पोस्ट केली होती. यानंतरच बँकेकडून ही सूचना देण्यात आली आहे.

एसबीआयने ग्राहकाला तात्काळ ऑनलाइन शेअर करण्यात आलेली खासगी माहिती जाहीर करणारं ट्विट डिलीट करण्यास सांगितलं असून, फक्त आपली शंका रिपोस्ट करण्यास सांगितलं आहे.

एसबीआयने ग्राहकाला इशारा देताना लिहिलं आहे की, “कृपया आपलं खातं क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा खात्याशी संबंधित कोणतीही खासगी माहिती सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जाहीर करु नका. जर तुमचं काही नुकसान झालं तर त्यासाठी बँक जबाबदार राहणार नाही. कृपया तुम्ही दिलेली माहिती डिलीट करा आणि रिपोस्ट किंवा डीएम करा”.

“एसबीआय किंवा त्यांचे कर्मचारी कधीही तुम्हाला फोन, एसएमएस, ईमेलच्या माध्यमातून पेमेंट लिंक पाठवणार नाहीत तसंच व्हीपीए-युपीआयशी संबंधित संवेदनशील माहिती, युजर आयडी, पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी इतर गोष्टी विचारणार नाहीत,” असंही एसबीआयने सांगितलं आहे.