इंडियन बँक असोसिएशनने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या (१९ नोव्हेंबरला) सर्व बँकांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांना नोटा बदलून मिळणार आहेत. या व्यक्तिरिक्त नोटा बँकेत जमा करण्याचे आणि नोटा काढण्याचे काम सुरूच राहणार आहे.

‘संपूर्ण देशांतील बँकांमधील रांगा आता कमी होऊ लागल्या आहेत. शनिवारी (१९ नोव्हेंबरला) फक्त जेष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून दिल्या जातील,’ अशी माहिती इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ऋषी यांनी दिली आहे. आठवड्याभरातील प्रलंबित कामे शनिवारी पूर्ण केली जातील. रविवारी मात्र बँका बंद असतील, अशी माहिती राजीव ऋषी यांनी दिली आहे.

१० दिवसांपासून देशभरातील बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम सुरू आहे. बँकांसमोर मोठमोठया रांगा लागल्या आहेत. या रांगेत उभ्या असलेल्या ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वृद्धांचा आकडा मोठा आहे. आता शनिवारी (१९ नोव्हेंबरला) फक्त ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये नोटा बदलून मिळणार आहेत. त्यामुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली. पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय मोदींनी गेल्याच आठवड्यात जाहीर केला. यानंतर दुसऱ्या दिवशी बँका बंद होत्या. मात्र त्यानंतर जुन्या नोटा जमा करण्याचे, नोटा बदलून देण्याचे काम देशभरातील बँकांमध्ये सुरू झाले. १० नोव्हेंबरपासूनच बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. पाचशे आणि हजाराच्या नोटांचे चलनातील प्रमाण ८६ टक्के असल्याने देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झाला. या परिस्थितीत देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.