काळा पैसा परदेशात दडवून ठेवणारे आरोपी आणि त्या गुन्ह्य़ाचे लाभार्थी यांच्यासह ज्या बँका आणि वित्तीय संस्थांनी या गुन्ह्य़ांत मदत केल्याचे सिद्ध होईल त्यांच्यावरही आता नव्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नव्या कायद्यानुसार आता केवळ आरोपींवरच नव्हे तर त्याला सहकार्य करणारे आणि लाभार्थी यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले. काळा पैसा परदेशात दडवून ठेवण्यास मदत केल्याप्रकरणी एचएसबीसी बँकेवर आरोप ठेवण्यात आले असल्याने दास यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सदर गुन्हा वैयक्तिक पातळीवर अथवा संस्थांमार्फत करण्यात आला असेल मात्र त्यासाठी बँका अथवा वित्तीय संस्थांनी सहकार्य केले असण्याची शक्यता आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी लवकरच नवा कायदा केला जाईल आणि त्याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात मांडण्यात येईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातच घोषित केले आहे.
नव्या कायद्यामध्ये मोठय़ा दंडाची आणि दहा वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. काळा पैसा कायदा हा व्यापक कायदा असेल, मात्र भीतीचे वातावरण पसरविण्याचा त्यामागे हेतू नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले. उद्योग समूहांच्या संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.