भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये लुटले आहेत. गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता हा आकडा 72 टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी हा आकडा 23 हजार 933 कोटी होता. 2017-18 मध्ये बँकांची फसवणूक केल्याची 5076 प्रकरणं समोर आली असून गतवर्षी हा आकडा 5917 इतका होता. आकडेवारीवरुन बँकांची फसवणूक होण्याची प्रकरणं गेल्या चार वर्षांपासून वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. 2013-14 मध्ये फसवणुकीची 10 हजार 170 प्रकरणं समोर आली होती.

2017 -18 मध्ये बँकांची फसवणूक केल्याची जी प्रकरणं समोर आली आहेत त्यामध्ये ऑफ बॅलेन्स शीट ऑपरेशन, परदेशी चलन व्यवहार, जमा खाते आणि सायबर गुन्हे यांचा समावेश जास्त आहे. बँकांनी यावर्षी सर्वात जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. सायबर फसवणुकीची 2059 प्रकरणं समोर आली असून यामुळे बँकांना 109.6 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षी 1372 प्रकरणांमध्ये बँकांनी 42.3 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती दिली होती.

बँकांच्या आर्थिक फसवणुकीची जी प्रकरणं समोर आली आहेत त्यामध्ये 50 कोटींहून अधिक रकमेची 80 टक्क्यांहून जास्त प्रकरणं आहेत. सार्वजनिक बँकांमध्ये एक लाखाहून अधिक आर्थिक घोटाळ्याची 93 टक्के प्रकरणं समोर आली असून यात खासगी बँकांचा सहा टक्के सहभाग होता.

वाढत्या आर्थिक घोटाळ्यांनी बॅड लोनची आकडेवारी प्रचंड वाढवली आहे. मार्च 2018 मध्ये बॅड लोन 10,39,700 कोटी होतं. 2017-18 मधील ही आकडेवारी वाढण्यास पंजाब नॅशनल बँक मुख्य कारण राहिली. नीरव मोदीने केलेल्या 13 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे यावर्षी आर्थिक घोटाळ्याची आकडेवारी वाढली आहे. पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींता गंडा घालून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सध्या फरार आहे. वाढते आर्थिक घोटाळे आपल्यासाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचं आरबीआयने मान्य केलं आहे.