अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना सर्व राज्ये व राज्यस्तरीय बँकांच्या समितीला देण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी रिझव्‍‌र्ह बँकेनेही सर्व बँकांना मागदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची सूचना केली असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
देशाच्या अनेक भागांत अलीकडेच अवकाळी पाऊस पडला असून गारपीटही झाली आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर सरकारने भर दिल्याचे सिन्हा म्हणाले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे गुजरात, पंजाब, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यांतील ९३.८१ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल क्षेत्र
देशभरात मोबाइल सेवा सुरू होऊन दोन दशकांचा अवधी लोटला तरीही अद्याप ५५ हजार ६६९ गावांतील लोकांपर्यंत मोबाइल सेवा पोहोचलेली नाही, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येईल, असे प्रसाद म्हणाले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यासंबंधी तांत्रिक तयारी व अंदाजे खर्चाचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यासंबंधीच्या विकास आराखडय़ास सरकारने मंजुरी दिली आहे, असेही ते म्हणाले.
टपाल कार्यालयांमधील रक्कम
टपाल विभागातर्फे विविध बचत योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गुंतविण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपये रकमेवर कोणीही दावा सांगितलेला नाही, असे राज्यसभेत सरकारने सांगितले. टपाल विभागाच्या बचत खात्यामध्ये सुमारे १,००.६१ कोटी रुपयांवर कोणी दावा केलेला नाही. या रकमेत इंदिरा विकास पत्राच्या योजनेत गुंतवणूक झालेल्या ८९४.५९ कोटी रुपयांचा, पाच वर्षे मुदतीच्या राष्ट्रीय विकास योजनेशी संबंधित ६०.०२ कोटी रुपये तर मुदतबंद ठेवींमध्ये सुमारे २४.२० कोटी रुपयांचा समावेश असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली.
८०० हून अधिक वाहिन्यांना अनुमती
आतापर्यंत ८३२ दूरचित्रवाणी वाहिन्यांना अनुमती देण्यात आली असून त्यापैकी ४०६ वाहिन्या बातम्या आणि विद्यमान घडामोडींशी संबंधित आहेत. ४२६ वाहिन्या इतर घडामोडींशी संबंधित असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत दिली.
आकाशवाणीमध्ये गेल्या २० वर्षांत विविध विभागांत २६ हजार ४१८ जागा निश्चित केल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ७५८ जागा भरण्यात आल्याचे राठोड यांनी अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.