बँकातील गर्दीची परिस्थिती पाहता सरकारकडून बँकेतून एकदा पैसे काढल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटावर खूण म्हणून मतदानासारखी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी मंगळवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. काही लोक बँकेतून किंवा एटीएममधून दिवसभरात वारंवार पैसे काढत असल्यामुळे विनाकारण गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बँकांमध्ये असणाऱ्या मर्यादित चलनसाठ्यामुळे इतर लोकांनाही पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बँकेच्या कॅश काऊंटरवर एखाद्या व्यक्तीने व्यवहार केल्यानंतर त्याच्या हाताच्या बोटावर मतदानाप्रमाणे शाईची खूण करण्यात येईल, अशी माहिती शक्तिकांता दास यांनी दिली. आजपासून देशातील बहुतांश शहरातील बँकांमध्ये ही पद्धत लागू केली जाणार असल्याचेही दास यांनी सांगितले.

अनेकांनी काळे पैसे पांढरे करण्यासाठी लोकांचे नियोजनबद्ध गटच तयार केले आहेत, आणि या लोकांना नोटाबदलासाठी पाठवले जाते, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. या समस्येला आळा घालण्यासाठी आम्ही कॅश काऊंटरवर व्यवहार झाल्यानंतर मतदानाप्रमाणे शाईची खूण करण्याचा निर्णय घेतल्याचे दास यांनी सांगितले. याशिवाय, बँकांवरील ताण कमी करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचेही सांगितले. ही टास्क फोर्स जुन्या नोटांच्या साठवणुकीवर आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम करेल. तसेच टास्क फोर्सकडून जनधन खात्याच्या व्यवहारांवरही करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे दास यांनी सांगितले. लनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांत जनधन खात्यात अचानक मोठय़ा प्रमाणावर पैसा जमा होऊ लागला असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार सातत्याने या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत असून  येत्या काही दिवसातच सर्व काही सुरळित होईल, असा विश्वासही शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला. दरम्यान, जनेतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही यावेळी दास यांनी केले. मीठासंबंधीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडे सरकारचे लक्ष असून सोशल मिडीयामधील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे दास यांनी सांगितले.