मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भोजन समारंभामधून गोवंशाचे मांस खाऊ घातल्याच्या संशयावरुन जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्ति जखमी झाला आहे. झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील डोमचांच पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी गावामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

परिस्थिती आता सामान्य आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. डोमचांचमधील नावादीह गावात राहणाऱ्या जूम्मन मीयान (५०) यांनी सोमवारी रात्री मुलाच्या लग्नाचा स्वागत सोहळा ठेवला होता. मंगळवारी सकाळी गावातील काही लोकांना प्राण्याच्या मांसाचे भाग दिसले. हे गोवंशाचे मांस असल्याचा दावा काहींनी केला. झारखंडमध्ये गोवंशाच्या मांसावर बंदी आहे.
पोलिसांना संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली. त्या दरम्यान नावादीह आणि आसपासच्या गावातील लोकांचा जमाव तिथे जमला. डोमचांच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या दरम्यान जमाव प्रक्षुब्ध झाला व त्यांनी जूम्मन मीयान यांना लक्ष्य केले. त्यांच्या घरात घुसूनही तोडफोड केली.

जमावाने केलेल्या दगडफेकीत काही गाडयांचे नुकसान झाले. त्या दरम्यान परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली. जूम्मन मीयान यांच्या शेजारच्या काही घरांचेही जमावाने नुकसान केले. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमारही करावा लागला. मोहम्मद इस्त्रायल नावाचा व्यक्ति या दगडफेकीत जखमी झाला. जेवणातून गोवंशाचे मांस दिल्याच्या आरोपाचीही चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. मांसाचे काही नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. व्हिडिओ आणि फोटोंच्या मदतीने आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत असे पोलिसांनी सांगितले.