रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार या दोघांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी मंगळवारीही संसदेचे कामकाज बंद पाडले. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. भाजपसह सर्व विरोधकांनी सभागृहामध्ये जोरदार घोषणा दिल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 
सत्ताधारी यूपीएने सोमवारी बहुप्रतिक्षित राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक लोकसभेत सादर केले. त्यावर मंगळवारी चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे त्यावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया टप्प्यामध्ये गेल्या २२ एप्रिलपासून एक दिवसही संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडलेले नाही. बन्सल आणि अश्विनीकुमार या दोघांच्या राजीनाम्यासाठी विरोधक सोमवारपासून आक्रमक झाले आहते.