अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी निश्चित झालेल्या हिलरी क्लिंटन यांचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केले. हिलरी क्लिंटन यांनाच आपलाही पाठिंबा असल्याचे बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळावी, यासाठी आतापर्यंत अमेरिकेतील लाखो लोकांनी आपले म्हणणे मांडले आहे. आता मी त्यामध्ये माझेही मत मांडू इच्छितो, असे सांगत ओबामा म्हणाले, हिलरी क्लिंटन यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी किती अवघड आहे. हे मला माहिती आहे. त्यामुळे हिलरी क्लिंटन ही जबाबदारी यशस्वी पद्धतीने पेलू शकतील, असे मला वाटते. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी इतका अनुभव आणि गुणवत्ता असलेली दुसरी व्यक्ती सध्यातरी मला दिसत नाही. हिलरी क्लिंटन अत्यंत धैर्यशील, मनापासून काम करणाऱ्या आणि प्रेमळ आहेत. परराष्ट्र खात्याची जबाबदारी संभाळताना त्यांची निर्णय घेण्याची अचूक क्षमता मी जवळून बघितली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.