‘‘माझ्या दोन मुलींपकी सर्वात प्रिय कोणती याची निवड करणे जसे अशक्य आहे, तद्वतच अमेरिकेला ब्रिटन आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांपैकी अधिक जवळचे कोण हे ठरविणे अशक्य आहे,’’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या सहकारी राष्ट्रांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
‘‘मला दोन मुली आहेत. दोघीही अतिशय गोजिरवाण्या आणि सुंदर आहेत. त्यांच्यातून केवळ एकीचीच निवड करणे अशक्य आहे. माझ्या देशाच्या दोघा युरोपीय सहकारी राष्ट्रांबद्दल असलेल्या भावनाही याहून वेगळ्या नाहीत. ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्ही राष्ट्रे आपापल्या परीने अमेरिकेसाठी सर्वोत्तमच आहेत,’’ अशा शब्दांत ओबामा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘तुमच्या मते युरोपातील ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यापैकी अमेरिकेचा सर्वोत्तम सहकारी देश कोणता’ या पत्रकारांच्या प्रश्नास मोठय़ा खुबीने बगल देत त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
 ‘आवडते’ होण्याचा अट्टहास नाही..
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कॉइस होलाँदे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीनंतर व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ओबामा आणि होलाँदे यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. ओबामांना पेचात पकडणारा ‘सर्वोत्तम सहकारी राष्ट्राचा’ प्रश्न विचारल्यानंतर, होलाँदे यांनी ‘समंजस मित्रराष्ट्राची’ भूमिका घेत, एकमेकांचे आवडते होण्याचा आमचा अट्टहास नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. समान मूल्यव्यवस्था हा आम्हाला बांधणारा खरा धागा आहे आणि जगासाठी आमची मैत्री कितपत उपयुक्त ठरते यात आम्हाला अधिक रस आहे, असे होलाँदे यांनी सांगितले.

कोणाशीही ‘शून्य टेहळणी’ करार नाही
गोपनीय माहिती गोळा करताना प्रत्येक राष्ट्राच्या व्यक्तिगततेचा सन्मान राखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. मात्र असे असले तरी एकाही राष्ट्राशी अमेरिकेने ‘शून्य टेहळणी’ करार केलेला नाही, अशा शब्दात अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाचे वर्णन केले. ब्रिटनशी आपला ‘शून्य टेहळणी करार’ असल्याचा आरोप तथ्थ्यहीन आहे. कोणत्याच राष्ट्राशी असा करार झालेला नाही, असे स्पष्टीकरण एका प्रश्नाचे उत्तर देताना ओबामा यांनी सांगितले. तसेच फ्रेंच सरकारशी असलेले गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.