अमेरिकेसाठी २०१४ हे वर्ष कृतीचे असेल, असा संकल्प अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी सोडला. वर्षअखेरच्या भरगच्च पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अर्थव्यवस्था, आरोग्यविषयक धोरण, परराष्ट्र धोरण या क्षेत्रांत आपल्याला खूप काही करून दाखवायचे आहे, असे ते म्हणाले.
ओबामा म्हणाले, अमेरिकेसाठी पुढील वर्ष हे कृतीचे असेल. आपण अनेक क्षेत्रांत आणखी प्रभावी काम करण्याची गरज आहे. रोजगाराच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करावे लागेल. या रोजगारांना पात्र ठरण्यासाठीचे शिक्षण तरुणांना द्यावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा मध्यमवर्गीय असणाऱ्यांच्या हिताकडे आमचे नेहमीच लक्ष असून या वर्गात आणखी नागरिक कसे येतील, या दृष्टीने धोरण ठरवावे लागेल. हे सर्व साध्य झाल्यानंतर आपला समाज आर्थिकदृष्टय़ा आणखी सक्षम होईल, यात शंका नाही. पुढील वर्ष हे आपल्यासाठी नक्कीच चांगले असेल, कारण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. अमेरिकी उद्योगांनी आणखी २० लाख रोजगारांची निर्मिती केल्याने बेरोजगारीचा आलेख खालावला आहे.  
मी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा असणारी वित्तीय तूट निम्म्याने कमी झाली आहे. आपले करविषयक धोरणही किचकट नाही. तेलनिर्मितीमध्ये आपण खूपच प्रगती साधली असून आयात होणाऱ्या इंधनापेक्षा इथे उत्पादित होणाऱ्या इंधनाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच हे घडत आहे, त्यामुळे इंधनाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने प्रवास करत आहोत,असे त्यांनी नमूद केले आहे.
सर्वत्र लोकशाही नांदावी
अमेरिकेवर दहशतवादी हल्ले न होण्यासाठी, तसेच परदेशातील अमेरिकी कर्मचारी-अधिकारी सुरक्षित राहण्यासाठी आम्ही नेहमीच सतर्क राहू, मात्र जगातील सर्वच देशांत लोकशाही व शांतता नांदावी, असे आम्हाला वाटते. इराणची महत्त्वाकांक्षी अणू योजना कशी रद्द होईल, तसेच सीरियामधील संहारक रासायनिक शस्त्रांचा कसा नायनाट होईल, यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे ते म्हणाले. पुढील वर्षअखेरीपर्यंत अफगाणिस्तानातून आमचे सैन्य पूर्णपणे माघारी येईल, असेही त्यांनी सांगितले.