पाकिस्तानला एफ १६ विमानांची विक्री करणे चुकीचे आहे कारण तो देश दहशतवादाच्या विरोधातील लढाईत दुटप्पीपणा करीत आहे, अशा शब्दात रिपब्लिकन सिनेटर बॉब कॉर्कर यांनी ओबामा प्रशासनाला घरचा अहेर
दिला.
सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष बॉब कॉर्कर यांनी सांगितले की, पाकिस्तानने एफ १६ विमाने सवलतीत मागितली असता, त्यांना निम्म्या किमतीत ही विमाने देण्याची काही गरज नव्हती. एक प्रकारे शस्त्र खरेदीसाठी पाकिस्तानला अमेरिकेने करदात्यांच्या पैशातून अनुदान दिले आहे. त्याऐवजी पाकिस्तानला अमेरिकी कंपनीकडून थेट विमाने घेण्यासाठी पैसे मोजायला लावणे गरजेचे होते. गेले चौदा वर्षे पाकिस्तानने अफगाणिस्तानातही असाच दुटप्पीपणा केला आहे, माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का असा सवाल त्यांनी परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्यापुढे वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदींवर म्हणणे मांडताना केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवाद थांबवण्यात काय मदत केली याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आपण अलीकडेच भेट घेतली असून त्यांना दहशतवादी गटांवर कारवाई करण्यास सांगितले आहे असे उत्तर केरी यांनी यावर दिले. त्यावर कॉर्कर यांनी सांगितले की, मी अफगाणिस्तानात काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा पाकिस्तान तेथील हक्कानी नेटवर्कला पाठिंबा देत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे.