गुजरात दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता त्यांच्या देशाला भेटीचे आवतण दिले आहे. अमेरिका मोदी सरकारबरोबर द्विपक्षीय संबंधात एकविसाव्या शतकात अर्थपूर्ण भागीदारी करू इच्छिते, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आह़े
या पत्राच्या प्रतिसादात मोदी यांनी ओबामा यांचे आभार मानले असून, सप्टेंबरमध्ये अमेरिका दौरा होणार असून, त्यातून काहीतरी ठोस निष्पन्न होईल व धोरणात्मक भागीदारीला ऊर्जितावस्था प्राप्त होईल अशी आशाही मोदींनी व्यक्त केली आहे.
ओबामा यांचे निमंत्रण अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री विल्यम बर्नस यांनी त्यांची भेट घेऊन दिले.
पत्र मिळाल्यानंतर मोदी यांनी सांगितले, की या भेटीची फलश्रुती नक्कीच चांगली व ठोस असेल, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवा आयाम मिळेल. दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत झाल्यास जगातील देशांना त्यातून वेगळा संदेश मिळेल.
बर्नस यांनी सांगितले, की प्रगत तंत्रज्ञान, ऊर्जासुरक्षा, दहशतवादाचा प्रतिकार व गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, अफगाणिस्तानप्रश्नी समन्वय, आशियाची सुरक्षा व भरभराट, आर्थिक संबंध यावर काम करण्याची ओबामा यांची इच्छा आहे.
दोन्ही देशांत बऱ्याच संधी आहेत व सहकार्याला पुरेपूर वाव आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की सर्व शेजारी देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याचा आमचा विचार आहे.
आपण पंतप्रधान झाल्यानंतर मे महिन्यात ओबामा यांचा अभिनंदन करणारा दूरध्वनी आला होता असे सांगून मोदी म्हणाले, की अध्यक्ष ओबामा यांनी अतिशय सविस्तरपणे दिलेल्या आमंत्रणाचा आपण स्वीकार करतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, अमेरिकेच्या चार्ज द अफेअर्स कॅथलिन स्टीफन्स व दक्षिण आशियाविषयक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल आदी या वेळी उपस्थित होते.