उत्तर कोरियाने अलीकडेच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी तसेच उपग्रह सोडण्याच्या नावाखाली केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी या दोन घटनांमुळे त्या देशावर आणखी र्निबध जारी करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली आहे. दक्षिण कोरिया, फिलिपीन्स व जपान हे देश उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांनी संतप्त झालेले आहेत. त्याशिवाय अमेरिकेनेही तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
व्हाइट हाऊसने म्हटले आहे, की ओबामा यांनी उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी काँग्रेसने मंजूर केलेल्या दंडात्मक उपायांच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार त्या देशाला महासंहारक अस्त्रे तयार करण्याची सामग्री निर्यात करणारे देश व तंत्रज्ञान देणारे देश यांच्यावरही कारवाई होऊ शकते. तेथील मानवी हक्क उल्लंघनास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्यांनाही यात इशारा देण्यात आला आहे.
उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्यामुळे दक्षिण कोरिया व जपान यांची डोकेदुखी वाढली आहे.
अमेरिकेने तर दक्षिण कोरियाच्या त्या देशानजीक सीमेवर क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसवण्याचे सूतोवाचही केले आहे. चीनने मात्र उत्तर कोरियाविरोधी कारवाईत जागतिक समुदायाला पाठिंबा देण्यात हेतूत: कुचराई केली आहे, त्यामुळे उत्तर कोरिया विरोधातील कारवाईत सुरक्षा मंडळातच मतैक्य नाही असे चित्र समोर आले आहे.