भारत व पाकिस्तान यांनी अण्वस्त्रसाठा कमी करतानाच लष्करी धोरणात्मक करारांचे मसुदे तयार करताना चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत नाही ना, याची दक्षता घ्यावी, असे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अणुसुरक्षा शिखर बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, की अमेरिका व रशिया यांनी अण्वस्त्रसाठा कमी करण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे,नाही तर इतर देशही त्या दिशेने पावले टाकतील. पाकिस्तान व भारत यांनी उपखंडात लष्करी धोरणांची आखणी करताना त्यांनी चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करू नये.
उत्तर कोरियामुळे जगाला मोठा धोका आहे. त्यामुळेच कोरियन द्वीपकल्पात आम्ही संबंधित देशांनी व्यक्त केलेल्या चिंतांची दखल घेतली आहे. त्यासाठी जपान, दक्षिण कोरिया व अमेरिका यांची त्रिपक्षीय बैठक घेण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही अमेरिकेने या प्रकरणी चर्चा केली आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र व क्षेपणास्त्र चाचण्या यामुळे तेथील परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेवून आहे.पाकिस्तानमधील शस्त्रागारात अण्वस्त्रांची संख्या वाढत आहे, त्यामुळे अमेरिकेला चिंता वाटत असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी अमेरिका व रशिया यांनी अण्वस्त्रे कमी करण्याचे ठरवले आहे असे महिन्यापूर्वी सांगितले होते.