अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या आशिया अमेरिकन अँड पॅसिफिक आयलँडर्स कमिशनच्या सल्लागार मंडळावर १४ जणांची नियुक्ती केली असून, त्यात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हवाई दलातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवि चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर नरसिंहन व चित्रपट, दूरचित्रवाणी कलाकार मौलिक पंचोली यांचा समावेश आहे. मूळ बांगलादेशी असलेल्या एन. नीना अहमद यांनाही नेमण्यात आले आहे.
ओबामा सध्या आशियातील चार देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी व्हाइट हाऊसमधून जारी केलेल्या निवेदनात सल्लागारांची नावे जाहीर करताना असे म्हटले आहे, की प्रशासनास त्यांच्या अनुभवाची मदत होईल व त्यांच्याबरोबर येत्या काही महिन्यांत, वर्षांत आपण काम करू. लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी तीन हजार तास विमान चालवले असून त्यांनी युद्धात ७०० तास विमान चालवले आहे. नरसिंहन हे प्रुडेन्शियल मॉडगेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पंचोली हे जोनाथन फॉर सिक्स सिझन्स या एनबीसी पुरस्कार विजेत्या मालिकेत काम करीत आहेत.