रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याच्या आरोपावरून जगभरात सीरियाविरोधात वातावरण तापलेले आहे. अमेरिकेने सीरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे आमच्यावर हल्ला केल्यास प्रादेशिक युद्ध पेटून अराजकता माजेल, असा इशारा सीरियाचे राष्ट्रपती बाशर अल असद यांनी अमेरिकेला दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सीरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याबाबत परवानगी देण्यास महत्त्वाच्या सिनेटर्सनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सीरियाविरोधातील लष्करी कारवाई करण्याच्या ओबामा यांच्या निर्णयाला बळ मिळाले आहे.
अमेरिका आणि तिच्या सहकारी राष्ट्रांनी सिरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास गोंधळ माजेल आणि दहशतवाद पेटेल. तसेच अराजकता माजेल. एक प्रकारे प्रादेशिक युद्धच पेटेल, असा इशारा असद यांनी एका फ्रान्सच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिला.
अमेरिका आणि फ्रान्सने सिरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता असद यांनी अमेरिकेला इशारा दिला. सरकारने कोणत्याही प्रकारच्या रासायनिक अस्त्रांचा वापर केलेला नाही, तर बंडखोरांनीच रासायनिक अस्त्रांचा वापर सरकारी यंत्रणांविरोधात केल्याचा दावा असद यांनी केला.
दरम्यान, रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप करीत अमेरिकेने सिरियाविरोधात लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. त्याला जगभरातील अनेक राष्ट्रांनी विरोध केला आहे. तसेच अमेरिकेतही लष्करी कारवाईबाबत मतभिन्नता आहे. त्यामुळे अध्यक्ष ओबामा यांनी सिनेटर जॉन मॅक केन आणि लिंडसे ग्रॅहम यांच्याशी याबाबत चर्चा केली असता दोघांनी सिरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे ओबामा यांच्या निर्णयाला बळ मिळाले आहे.
इस्रायल- अमेरिका संयुक्त क्षेपणास्त्र चाचणी
सिरियामधील तणावाच्या पाश्र्वभूमीवर इस्राएल आणि अमेरिकेने भूमध्य समुद्रात मंगळवारी संयुक्तपणे क्षेपणास्त्र चाचणी केली. तणावाच्या पाश्र्वभूमीवरच क्षेपणास्त्र चाचणी करून अमेरिकेने लष्करी ताकदीचे प्रदर्शन केले आहे. इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत संयुक्तपणे क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार सकाळी ९.१५ ला क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर अमेरिकेने मात्र लगेचच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ब्रिटनच्या दाव्याबाबत भारताची नाराजी
सिरियात कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला भारताचाही पाठिंबा असल्याचा दावा इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारताने कॅमरून यांच्या वक्तव्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच इंग्लंड सरकार आणि दिल्लीतील इंग्लंड दूतावासाकडे याबाबत हरकत नोंदविण्यात आली असून त्यांनीही ही बाब चुकून घडल्याचे मान्य केल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवडय़ात आपत्कालीन सत्रात पंतप्रधान कॅमरून यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईत इंग्लंडनेही सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच या कारवाईला भारतासह अनेक देशांनी पाठिंबा दिल्याचेही सांगितले होते.
लष्करी कारवाई हा उपाय नाही – भारत
भारताने अमेरिकेच्या भूमिकेविरोधात मतप्रदर्शन केले आहे. सिरियात उद्भवलेल्या समस्येवर लष्करी कारवाई हा तोडगा होऊ शकत नसल्याची भूमिका भारताने मांडली आहे.  रासायनिक शस्त्रांच्या वापराची संयुक्त राष्ट्रांकडून सुरू असलेला तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कार्यवाहीचा विचार करण्याची गरज असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच सिरियाप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद (जिनिव्हा-२) घेऊन तोडगा काढणे अधिक योग्य असल्याचेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. जगातील रासायिक अस्त्रे नष्ट करावीत, अशी भारताची आग्रही भूमिका असल्याचेही या प्रवक्याने म्हटले आहे.