मंगळवारी होणाऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’साठी आपण पूर्ण सज्ज असल्याचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रथेनुसार राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांमधील निवडणूकीपूर्व वादविवादाची दुसरी फेरी मंगळवारी होणार आहे. मागील भाषणाच्या तुलनेत यावेळी बराक ओबामा आक्रमक पवित्रा धारण करतील असा विश्वास राष्ट्राध्यक्षांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील विलियम्सबर्ग येथे होणाऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’साठी शनिवारपासूनच ओबामा यांनी येथे तळ ठोकला आहे. मागील फेरीत ओबामांच्या तुलनेत किंचित वरचढ ठरणाऱ्या रिपब्लिक पक्षाच्या मीट रॉम्नी यांनी जनमानसात आपली छाप पाडल्याचे चित्र आहे. त्यामुळेच या फेरीत ओबामा रॉम्नी यांच्यावर काय पलटवार करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ओबामा या फेरीत अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणे, वाढती गुंतवणूक, रोजगाराच्या नवनवीन संधी या मुद्यांच्या आधारे रॉम्नी यांच्यावर मात करतील असा विश्वास ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेमार्फत व्यक्त करण्यात आला.
तर यावेळीही मागचीच पुनरावृत्ती करण्यात रॉम्नी यशस्वी होतील अशी खात्री मीट रॉम्नी यांच्या प्रचार यंत्रणेद्वारे व्यक्त केली गेली.