अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपत आहे. तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर काय करणार हा प्रश्न त्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून विचारला जात आहे. एका कंपनीने बराक ओबामा यांना नोकरीची ऑफर दिली आहे. गंमत म्हणजे या नोकरीमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे असा विनोद बराक ओबामांनी केला होता. त्यांच्या या विनोदाला हसण्यावारी न नेता स्पॉटिफाय या कंपनीच्या सीईओंनी थेट बराक ओबामांनाच नोकरी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्पॉटिफाय ही एक ऑनलाइन म्युझिक कंपनी आहे.

आपल्या आवडीनिवडीनुसार गाणी निवडून स्पॉटिफायवर वाजवता येतात. तसेच दुसरी कुणी सुचवलेली गाणी सुद्धा तुम्हाला यावर ऐकता येतात. याच कंपनीने बराक ओबामांना नोकरीची ऑफर दिली आहे. अगदी बराक ओबामांच्या प्रतिमेला साजेसे पद या कंपनीने तयार केले आहे. आम्हाला ‘प्रेसिडंट ऑफ प्लेलिस्ट’ हवा आहे असे कंपनीने आपल्या ‘व्हॅकंसी पेज’ वर लिहिले आहे. या जाहिरातीमध्ये पात्रता म्हणून कंपनीने लिहिले आहे की उमेदवाराजवळ एखाद्या महत्त्वपूर्ण राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवल्याचा किमान आठ वर्षांचा अनुभव हवा. तसेच त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक देखील मिळालेले हवे, तो मैत्रीपूर्ण असावा आणि खेळीमेळीने काम करण्याचा त्याचा स्वभाव हवा अशा पात्रता अटी कंपनीने ठेवल्या आहे. एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भूषविण्याचा आठ वर्षे अनुभव आणि शांततेचा नोबेल पुरस्कार या दोन्ही अटी बराक ओबामा पूर्ण करतात.

स्पॉटिफायचे सीईओ डॅनियल एक यांनी याबाबत ट्विट केले आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्ही स्पॉटिफायमध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहात तेव्हा ही जाहिरात तुम्ही पाहिली का? असे डॅनियल यांनी विचारले आहे. स्पॉटिफाय ही स्वीडनची कंपनी आहे. एकदा स्वीडनच्या राजदुतांसोबत बोलताना बराक ओबामा म्हणाले होते की, ‘मला स्पॉटिफायमध्ये जॉब करायला आवडेल. मला माहित आहे की मी तयार केलेल्या प्लेलिस्ट तुम्हाला नक्की आवडतील.’ त्यांच्या या वाक्याचाच संदर्भ घेऊन स्पॉटिफायने बराक ओबामा यांना फेअरवेल गिफ्ट म्हणून ही ऑफर देऊ केली आहे.

या ऑफरमध्ये प्रेसिडंट ऑफ प्लेलिस्टची कर्तव्ये देखील देण्यात आली आहे. आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणे, स्वतःच्याच नावाने सुरू करण्यात आलेल्या हेल्थकेअर बदद्ल भाषण करणे, नवीन प्लेलिस्ट तयार करणे ही जबाबदारी तुमची असेल असे यात म्हटले आहे. ओबामांच्या प्रसिद्ध भाषणांचे उतारे देखील या जाहिरातीमध्ये आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील या जाहिरातीमध्ये टोमणा मारण्यात आला आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना भेदभावरहित वागणूक देतो आणि तसेच वातावरण निर्माण करतो असा टोमणा या जाहिरातीमध्ये मारण्यात आला आहे. ओबामांना या जाहिरातीला अद्याप उत्तर दिले नाही परंतु त्यांच्या खिलाडू वृत्तीनुसारच ते काही तरी उत्तर देतील असा तर्क बांधला जात आहे.