बराक ओबामा यांचे अमेरिकी मतदारांना आवाहन

माझ्यासाठी केले तेच हिलरी क्लिंटन यांच्यासाठीही करा. डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारून हिलरींना निवडून द्या, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना केले.

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यापूर्वी ओबामा यांनी मिशिगन राज्यातील अन अबरेर येथे आयोजित सभेत आपले विचार मांडले तसेच त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही केले. ओबामा यांच्या मंत्रिमंडळात हिलरी परराष्ट्रमंत्री आहेत. बराक आणि मिशोल ओबामा हे अमेरिकेचे पहिले दाम्पत्य हिलरी यांचे खंदे समर्थक आहे. त्यांनी हिलरी यांच्या प्रचारासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.

पारंपरिकदृष्टय़ा मिशिगन हे राज्य म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती बदलली आहे. तेथून डेमोक्रॅटिक पक्षाला स्पष्ट पाठिंबा मिळेल हे सांगता येत नाही. तेथे यंदा दोन्ही पक्षांत लढत होण्याची शक्यता आहे आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना या राज्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

..तर अमेरिकेने केलेली प्रगती फोल ठरेल!

हिलरी क्लिंटन यांना निवडून दिले नाही तर माझ्या आठ वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेने जी प्रगती केली आहे ती फोल ठरेल. त्यामुळे क्लिंटन यांनाच विजयी करा, असे आवाहन बराक ओबामा यांनी अमेरिकी मतदारांना केले. अखेरच्या टप्प्यात ओबामा यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवार हिलरी यांच्या प्रचारासाठी मिशिगनमध्ये सभा घेतली. तेथे त्यांनी मतदारांना हे आवाहन केले.

ट्रम्प यांची नोकऱ्या देण्याची भाषा फसवी

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. सध्याच्या परिस्थितीत नोकऱ्या मिळवून देण्याची किंवा नोकऱ्या तयार करण्याची ट्रम्प यांची भाषा फसवी असल्याचे ओबामा यांनी सांगितले.

देशातील युवकांना, नागरिकांना नोकऱ्या देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली असली तरी त्याबाबत ते गंभीर नाहीत, असेही ओबामा म्हणाले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ओबामा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेचा कोणताही अभ्यास केलेला नाही. आम्ही सलग ७३ महिने मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या निर्माण केल्या. देशातील बेरोजगारी ४.९ इतकी असून ती गेल्या नऊ वर्षांतील सर्वात निम्न स्तरावरील आहे, असेही ओबामा यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ट्रम्प हे मूळ मुद्दय़ाकडे लक्ष न देता केवळ विरोध करत आहेत. आणि आम्ही केलेल्या विकासकामांना ते आपत्ती म्हणत आहेत. ही आपत्ती आहे का? असा सवालही ओबामा यांनी यावेळी उपस्थित केला.