बराक ओबामा यांचा चीनला इशारा

चीनने दक्षिण सागरात आक्रमक वर्तन चालू ठेवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. शेजारी देशांना चीनने त्रास देऊ नये असे त्यांनी चीनला सूचित केले आहे. ओबामा आंनी सांगितले, की चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यात चीनला संयम राखण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेची जी आजची ताकद आहे ती संयमातून निर्माण झालेली आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय नियम मान्य करतो तेव्हा ते प्रदीर्घ काळासाठी मान्य केलेले असतात. मजबूत आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणे हिताचे आहे. चीनने आक्रमकता न दाखवणे हे त्यांनाच पुढे जाऊन फायद्याचे आहे. दक्षिण चीन सागरातील त्यांच्या वर्तनात जेव्हा नियमांचे उल्लंघन केले जाते किंवा आर्थिक धोरणातही काही बाबी सामोऱ्या येतात तेव्हा त्यावर आम्ही खंबीर भूमिका घेतली आहे, असे ओबामा यांनी याबाबत सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. चीनने आंतरराष्ट्रीय नियम व मानकांचे पालन करावे तरच आम्ही त्यांच्याशी भागीदारी करू शकतो. अमेरिका व चीन यांच्यात मैत्रिपूर्ण स्पर्धा असावी, ती नसण्याचे काही कारण नाही. दोन्ही देशांपुढे असलेल्या प्रश्नात भागीदारी महत्त्वाची आहे. चीन हा अब्जावधी लोकांचा देश आहे. त्यांची आर्थिक ताकदही मोठी आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा प्रश्न येतो तेव्हा चीनला मोठे स्थान मिळाले पाहिजे यावर दुमत नाही. आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन केले तर चीनचा शांततामय उदय स्वागतार्हच आहे. सर्वासाठीच ते फायद्याचे आहे. दरिद्री किंवा डबघाईस आलेला, कोसळणारा चीन हा कुणालाच फायद्याचा नाही असे ओबामा यांनी सांगितले.