जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथे कालपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादच्या जंगलात लष्कर आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये काल(बुधवारी) चकमक उडाली होती. लष्कराने जोरदार हल्ला करत काल चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण एक दहशतवादी जंगलात लपून बसला होता. अखेर त्याचाही खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. सध्या परिसरात चकमक थांबल्याचं सांगितलं जात असून शोधमोहिम मात्र सुरू असल्याची माहिती आहे.

रफियाबादच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. तसेच शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने बेछुट गोळीबार करण्यास सुरुवात केली. लष्कराकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यात चार दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर बारामुल्ला- उरी रोडवर एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह अटक करण्यात आली.