स्पेनमध्ये बार्सिलोना येथे पदपथावरील लोकांवर करण्यात आलेल्या व्हॅन हल्ल्यातील चालकाची ओळख पटली असून, तो मोरोक्कोचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात तेरा जण मारले गेले होते.

कॅटॅलोनिया पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की या व्हॅनच्या चालकाची ओळख पटली आहे, पण त्याचे नाव जाहीर करता येणार नाही. प्रादेशिक अंतर्गत सुरक्षामंत्री जोआक्विम फोर्न यांनी सांगितले, की व्हॅनचा चालक युनूस अबुयाकुब होता हे आता स्पष्ट झाले आहे. मोरोक्कोचा बावीस वर्षीय तरुण या व्हॅनचा चालक होता. या हल्ल्यात बारा जणांचा समावेश होता. त्यातील तो एकच जण फरार आहे. इतरांना पोलिसांनी ठार मारले असून काहींना अटक करण्यात आली आहे. बार्सिलोना व कॅम्ब्रिल्स येथे दहशतवादी हल्ले लागोपाठ झाले होते. चौकशीकर्त्यांनी सांगितले, की अबदेलबाकी एस सॅटी या चाळीसवर्षीय इमामाने रिपोल येथे काही तरुणांना मूलतत्त्ववादाची शिकवण दिली होती. अबुयाकुब याच्यासह सर्व संशयित येथेच राहत होते. पोलिसांनी सोमवारी सकाळी आणखी काही घरांवर छापे टाकले असल्याचे फोर्न यांनी सांगितले. संबंधित इमाम काही काळ तुरुंगात होता व त्याने संशयितांशी संपर्क साधला होता. ‘एल मुंडो’ या वृत्तपत्राने म्हटले आहे, की सॅटी याची राशिद अगलिफ याच्याशी तुरुंगात मैत्री झाली होती. अगलिफ हा २००४च्या माद्रिद रेल्वे बॉम्बहल्ल्यात १८ वर्षांची शिक्षा भोगत असून, त्या हल्ल्यात १९१ जण ठार झाले होते. त्याने काही काळ बेल्जियममध्ये वास्तव्य केले होते. इमाम मंगळवारपासून बेपत्ता असून, त्याच्या निवासस्थानी शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. बुधवारच्या स्फोटात तो मारला गेला असल्याची शक्यता आहे. १२० गॅस कुप्यांसह बॉम्ब बनवणे सुरू असताना झालेल्या स्फोटात तो मारला गेला असावा. बार्सिलोनात आणखी हल्ले करण्यासाठी बॉम्ब तयार करण्याचे संशयितांचे काम सुरू होते. त्या ठिकाणी ट्रायअ‍ॅसिटोन ट्रायपेरॉक्साइड हे स्फोटक सापडले होते व त्याचा वापर आयसिस नेहमी करीत आहे.