पत्रकार बरखा दत्त यांनी बुधवारी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून ‘टाइम्स नाऊ’चे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले. ‘टाइम्स नाऊ’कडून प्रसारमाध्यमांचा आवाज बंद करण्याची, पत्रकारांवर खटले चालविण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याचा मुद्दा चर्चेला आणण्यात आला. ही मागणी करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना पत्रकार म्हणायचे का? त्यांच्या या मागणीमुळे मला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते. एकीकडे ते चर्चांमध्ये सतत पाकिस्तानची बाजू घेणारी वक्तव्ये करतात. मात्र, त्याचवेळी ते काही गोष्टींवर भाष्य करणे टाळतात. जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी युतीविषयी ते का बोलत नाहीत? भाजप-पीडीपी युतीच्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी पाकिस्तान आणि हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मोदींच्या पाकिस्तानविषयीच्या भूमिकेबद्दल ते का बोलत नाहीत, असा थेट सवाल बरखा दत्त यांनी उपस्थित केला.
अर्णब गोस्वामीला मोदींचा चमचा म्हणणाऱ्या वृत्तवाहिनीवर ट्विटरकरांची आगपाखड
काही दिवसांपूर्वी ‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून अर्णब गोस्वामी यांच्यावर अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. मात्र, ही एका चमच्याने घेतलेली मुलाखत आहे, असे ट्विट करून आज तकने एकच खळबळ उडवून दिली होती. या गोष्टीवरून वाद निर्माण झाल्यानंतर ‘आज तक’ने हे ट्विट मागे घेतले होते.