News Flash

भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांच्यासह चार पत्रकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान

मालिनी सुब्रह्मण्यम यांना एल साल्वादेरचे ऑस्कर मार्टिनेझ व तुर्कस्थानचे कान डुंदर यांच्यासमवेत पुरस्कार देण्यात आला.

| November 24, 2016 12:43 am

भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांना नक्षलग्रस्त बस्तर भागातून केलेल्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकूण चार पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मालिनी सुब्रह्मण्यम यांना एल साल्वादेरचे ऑस्कर मार्टिनेझ व तुर्कस्थानचे कान डुंदर यांच्यासमवेत पुरस्कार देण्यात आला.

इजिप्तचे सध्या तुरुंगात असलेले छायाचित्रकारअबाऊ झैद ऊर्फ शौकन यांना अनुपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुब्रह्मण्यम या स्क्रॉल या संकेतस्थळासाठी काम करीत असून, त्यांनी नक्षलग्रस्त भागात महिलांविरोधात होणारा लैंगिक हिंसाचार, पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून होणारा अत्याचार याविरोधात बातम्या दिल्या होत्या. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हय़ात नक्षलग्रस्त भागात लहान मुलांना होणारा कारावास, बंद पडलेल्या शाळा, न्यायबाहय़ मृत्यू, पत्रकारांना धमक्या असे विषय त्यांनी बातम्यांतून हाताळले.

सुब्रह्मण्यम यांनी सांगितले, की माझे जाबजबाब घेण्यात आले, पोलीस व पोलिसांच्या खबऱ्यांनी छळ केला, माझ्यावर पाळतही ठेवण्यात आली. या परिस्थितीतही मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत व तेथील राजकारणाबाबत बातम्या दिल्या. पोलिसांनी मला माओवाद्यांची हस्तक ठरवण्याचाही प्रयत्न केला.

मार्टिनेझ यांना एल साल्वादोर येथून तीन आठवडे बाहेर जावे लागले, कारण त्यांना पोलिसांनी ठार केलेल्या आठ संशयितांच्या प्रकरणातील चौकशीबाबत धमक्या येत होत्या. दुंदर यांना २६ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती, कारण सरकारी गुप्तचरांनी सीरियन बंडखोर गटांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न केल्याबाबत लेख त्यांनी लिहिला होता. सरकारी गुपिते फोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. झैद यांना १४ ऑगस्ट २०१३ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हत्यारे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, खून व खुनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

या चार पत्रकारांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्र स्वातंत्र्य जिवंत ठेवले आहे व समाजाला महत्त्वाच्या घटनांबाबत खरी माहिती दिली आहे, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेने पुरस्कारार्थीचा सन्मान करताना म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:43 am

Web Title: bastar journalist malini subramaniam honoured with press freedom award
Next Stories
1 निश्चलनीकरणास आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीला स्थगितीस नकार
2 पाक मोदींच्या जहालमतवादी धोरणांचा विरोध करणार
3 भारताने तीन सैनिक टिपल्यानंतर पाकिस्तानकडून भारताला चर्चेची विनंती
Just Now!
X