करोनाविरोधात दीर्घ लढाई लढावी लागेल. या महासाथीविरोधात विजय मिळेपर्यंत आपल्याला न थकता अखंड काम करावे लागेल. धैर्य आणि निश्चय आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जाईल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.

भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी करोनाविरोधात कार्यकर्त्यांना पाचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा सल्ला दिला. देशातील एकही गरीब उपाशी राहू नये याची दक्षता घेतली जावी, असेही सांगितले. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना आपापल्या परिसरातील गरीब, रोजंदारी मजूर यांना खाद्यान्नाची सुविधा पुरवण्याची सूचना केली असून त्याचे पालन करा, असे मोदी म्हणाले.

करोनासाठी तयार केलेल्या ‘पीएम-केअर’ गंगाजळीसाठी देणगी देऊन निधी उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मदतीचा हात पुढे करताना दुसऱ्याला बाधा होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी चेहऱ्यावर मास्क बांधा, अंतर राखा. केंद्र सरकारच्या वतीने ‘आरोग्य सेतू’ नावाचे अ‍ॅप बनवण्यात आले असून ते मोबाइलवर डाऊनलोड करा आणि अन्य किमान ४० जणांच्या मोबाइलवरही तो डाऊनलोड करून द्या. डॉक्टर, परिचारिका आदी रक्षणकर्त्यांचा सन्मान करा, करोनाविरोधातील संघर्ष हा युद्धापेक्षा कमी नव्हे, असेही मोदी म्हणाले.

देशभर रविवारी जनतेने रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवे उजळवले. पुन्हा एकदा देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. करोनामुळे निर्माण झालेल्या अंध:कारमय वातावरणात दिव्यांची उजळणी करून एकमेकांना धीर देण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते.

पंचसूत्री कार्यक्रम

* गरिबांना अन्नधान्यपुरवठा मोहीम.  मास्क वापरा. अन्य ४-५ व्यक्तींनाही द्या.

* किमान ४० ‘रक्षणकर्त्यां’ना धन्यवाद संदेश पाठवा.

* ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप वापरा. किमान ४० लोकांच्या मोबाइलवर डाऊनलोड करा.

* पंतप्रधान गंगाजळीसाठी निधी द्या.

‘भारताचे जगभरात कौतुक’

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता संचारबंदी आणि त्यानंतर २१ दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात ज्या सामंजस्याने आणि गांभीर्याने लोकांनी त्याचे पालन केले ते अभूतपूर्व म्हणायला हवे, अशा शब्दांत जनतेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. करोनाविरोधातील भारताच्या प्रयत्नांचे जगभरात स्वागत केले जात आहे. सध्या भारत युद्धपातळीवर काम करत आहे. सर्व राज्य सरकारांना बरोबर घेऊन करोनाविरोधात लढाई लढली जात आहे, असे मोदी म्हणाले.

‘त्या’ नऊ मिनिटांत वीज मागणीत ३२ गिगावॉट घट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे बंद करण्यात आल्याने भारतात ३२ गिगॅवॉट (३२ हजार मेगावॉट) वीज वापर कमी झाला.  ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संजालातील विजेची मागणी रात्री ८.४९ ते ९.०९ दरम्यान १ लाख १७ हजार ३०० मेगावॉटवरून ८५ हजार ३०० मेगावॉटपर्यंत खाली आली. याचा अर्थ वीज वापर ३२००० मेगावॉट म्हणजेच ३२ गिगावॉटने कमी झाला. विजेचे दिवे परत लावण्यात आल्यानंतर विजेची मागणी परत वाढली त्यावेळी विभवांतर (व्होल्टेज) ४९.७ ते ५०.२६ हर्टझ कंप्रतेला ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही गोंधळ झाला नाही.

ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, ग्रीड संचालक पोसोकोने विजेचा समतोल साधून चांगले काम केले आहे. एनएचपीसी, नीपको, टीएचडीसी, एसजेव्हीएनएल, बीबीएमबी, एनटीपीसी तसेच राज्यांच्या वीज कंपन्यांनीही चांगले काम केले त्यामुळे गोंधळ  झाला नाही.

महाराष्ट्रातही घट :  महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्राच्या माहितीनुसार, नऊ मिनिटांच्या काळात विजेची मागणी ३२३७ मेगावॉटने कमी झाली. ८.५९ वाजता विजेची मागणी १३१६० मेगावॉट होती ती ९.०५ वाजता ९९२३ मेगॉवॉट इतकी खाली आली होती. मुंबईत विजेची मागणी ८.५९ वाजता १७२२ मेगावॉट होती ती ९.०५ वाजता १२५५ मेगावॉट होती.