News Flash

“मी भारतीयांना आश्वासन देतो की, या हल्ल्यानंतर…”; शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा

छत्तीसगडमध्ये २२ जवान शहीद झाल्यानंतर पहाणी दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाह यांचं वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील आपली लढाई आणखीन ताकदीनं लढून आणि या लढाईत आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केलाय. संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाल्याची माहिती रविवारी समोर आली. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरलं असून याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह यांनी केली तसेच त्यांनी शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.

“पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मी या नक्षलवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या जवानांचं बलिदान देश कायमच लक्षात ठेवले. या जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील,” असं शाह यांनी जगदालपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहचल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या दुर्देवी हल्ल्यामुळे नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झालीय,” असंही शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

“मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या अधिकाऱ्यांनी हा लढा असाच सुरु ठेवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावरुन आपल्या संरक्षण दलातील जवानांचे नक्षलवादाविरोधात लढा देण्याचं धैर्य कायम असल्याचं दिसून येत आहे,” असं शाह म्हणाले.

पुढे बोलताना शाह यांनी, “मी प्रत्येक भारतीयाला आश्वासन देतो की ही नक्षलवादाविरोधातील लढाई भविष्यात अधिक तीव्र होणार असून शेवटी आपलाच विजय होणार आहे. आपण मागील काही वर्षांमध्ये यशस्वीपणे अनेक अंतर्गत भागांमध्ये संरक्षण दलांच्या छावण्या उभारल्या आहेत. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी संतापून अशाप्रकारला हल्ला केलाय,” असंही सांगितलं.

अमित शाह यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे दोन महत्वाच्या गोष्टींवर काम करत नक्षलवादाला तोंड देण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. आदिवासी भागामध्ये विकासकामांना गती देणं आणि सशस्त्र लढ्याला चोख उत्तर देण्याच्या माध्यमातून नक्षलवादाविरोधात दुहेरी लढा सुरु असल्याचा शाह यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील लढा अधिक तीव्र होणार असल्याचं मी छत्तीसगडमधील नागरिकांना आणि सर्व देशवासियांना सांगू इच्छितो, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

अद्याप काही जवान बेपत्ता…

चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढले, असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.

गोळ्यांनी चाळण झालेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. जवानांवर अचानक हल्ला केला. चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले. मृतदेहांवर गोळ्यांबरोबरच धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळल्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

काय होती मोहीम…

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती, असेही सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 2:18 pm

Web Title: battle against naxals will be intensified and we will win it in the end union home minister amit shah in chhattisgarh scsg 91
Next Stories
1 छत्तीसगड : नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झालेल्या ठिकाणाला भेट देणार केंद्रीय गृहमंत्री
2 करोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण; ५०० मृत्यू
3 छत्तीसगडमध्ये २२ जवान शहीद होणं गुप्तचर यंत्रणेचं अपयश?; CRPF प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X