कर्मचाऱ्यांच्या सक्तीने केल्या जाणाऱ्या कपातीच्या निषेधार्थ बीबीसीचे पत्रकार रविवारी मध्यरात्रीपासून २४ तासांच्या संपावर गेले. पत्रकारांच्या या संपामुळे  दूरचित्रवाहिनी तसेच रेडिओच्या सेवेवर परिणाम झाला आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या (एनयूजे) सदस्यांनी मध्यरात्रीपासून २४ तासांचा संप पुकारल्यामुळे बीबीसी स्कॉटलंड, फाइव्ह लाइव्ह, द एशियन नेटवर्क आणि इतर सेवांवरही विपरीत परिणाम झाला आहे.
एनयूजेचे महासचिव मिशेल स्टॅनिस्ट्रीट यांनी सांगितले की, बीबीसीमधील सक्तीची कर्मचारी कपात आणि चांगली गुणवत्ता असलेल्या पत्रकारितेच्या बचावासाठी एनयूजेच्या सदस्यांनी संपाचे पाऊल उचलले आहे. बीबीसीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे पत्रकारांमध्ये मोठी नाराजीची भावना पसरली आहे. बीबीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजीची भावना कंपनी समजू शकते. मात्र तरीही संपाचे हत्यार उगारणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत पत्रकारांच्या संघटनेशी चर्चा करीत आहोत. त्यातून योग्य तो तोडगा निघण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. सन २००४ पासून बीबीसीतून सात हजार जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी एनयूजेने केली आहे.