क्षयरोगावर दिल्या जाणाऱ्या ‘बॅसिलस कालमेट ग्वेरिन’ म्हणजेच बीसीजी लशीमुळे करोना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात म्हटले आहे. ‘जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टिगेशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे, की सहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता हे स्पष्ट झाले,की ज्यांनी बीसीजी लस घेतली होती त्यांच्यात करोनाचा संसर्ग दिसून आला नाही.

सेडार्स-सिनाई हेल्थ सिस्टीम या संस्थेत हे संशोधन करण्यात आले. पूर्वी बीसीजी लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला असता त्यात किमान तीस टक्के व्यक्तीत कोविड १९ चाचणी सकारात्मक आली नाही. ज्यांनी बीसीजी लस घेतली नव्हती त्यांच्यात करोनाचा संसर्ग दिसून आला. या संशोधनात संबंधित व्यक्तींना न्यूमोकॉकल व इन्फ्लुएंझा लस दिली की नाही याचा विचार करण्यात आला नाही. ज्यांनी बीसीजी लस घेतली होती त्यांच्यात करोनाचे प्रतिपिंड कमी प्रमाणात दिसून आले, असे सहलेखक मोशे अरडिटी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ज्यांना बीसीजीची लस आधीच देण्यात आली होती त्यांच्यात करोनाने आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे. कारण त्यांच्यात या विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती वाढलेली असावी. बीसीजी लशीमुळे नवजात बाळांमध्ये होणारा श्वसन मार्गाचा संसर्ग यातही फायदा होतो. जगातील जुन्या लशींपैकी एक असलेली ही लस करोनाला काही प्रमाणात प्रतिबंध करते असे म्हणायला हरकत नाही. मधुमेह, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी जर बीसीजी लस पूर्वी घेतलेली असेल तरी त्यांना करोनाविरोधात फायदाच झाला आहे. बीसीजी ही करोनावरची लस नाही, पण सध्याच्या परिस्थितीत बीसीजी लशीवरचा हा अभ्यास महत्त्वाचा आहे.

इंदूरमध्ये एका दिवसात ५४६ करोना रुग्ण

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्य़ात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत असून एका दिवसात ५४६ करोना रुग्ण  आढळले आहेत. कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता राज्यातील या सर्वाधिक करोनाग्रस्त जिल्ह्य़ात ३७,६६१ झाली आहे. इंदूर हे व्यापार, व्यवसायाचे मोठे ठिकाण असून आतापर्यंत तेथे करोनाने ७३२ बळी गेले आहेत. तेथे करोनाचा मृत्युदर १.९४ टक्के आहे. सध्या देशातील करोना मृत्युदर १.४६ टक्के आहे. एकूण २८२५ रुग्ण उपचार घेत असून ३४१०४ रुग्ण बरे झाले आहेत. २४ मार्च रोजी इंदूरमध्ये पहिले चार रुग्ण सापडले होते. शनिवापर्यंत मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या १९१२४६ असून ३१४९ जणांचा मृत्यू झाला आहे.