काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी अल्पसंख्यांक समुदायांना वेगवेगळे मुद्दे उपस्थित करताना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. “मुस्लीमांनी मुद्दे उपस्थित करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. असं केल्यास भारतीय जनता पार्टीला समाजामध्ये फूट पाडण्याची (ध्रवीकरण करण्याची) संधी मिळणार नाही,” असं खुर्शीद म्हणाले आहेत. खुर्शीद हे राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपुरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

राजस्थानमधील स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळावलेल्यांच्या सन्मार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये खुर्शीद सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी मुस्लीम समाजातील सर्व गटांनी एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मत व्यक्त केलं. “आपण आपले मुद्दे उपस्थित करताना घाबरुन जाण्याचं कारण नाहीय. आपण भाग्यवान आहोत की गैरमुस्लीम कायमच आपल्या चिंतेसंदर्भातील मुद्दे उपस्थित करतात. काँग्रेसने कायमच देशातील ऐक्य टिकावण्यासाठी काम केलं. मात्र आज लोकशाही धोक्यात आहे. आपल्याला यापासून सावध राहत एकत्र राहण्याची गरज आहे,” असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका अधिकृत आकडेवारीनुसार भारतामध्ये १८ कोटींहून अधिक मुस्लीम आहेत. निवडणूक आयोगाने धर्माच्या आधारावर मतदारयादी तयार करण्याची परवानगी देत नाही. मात्र संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या २१८ ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या १० टक्क्यांपर्यंत आहे.

आणखी वाचा- मदत म्हणून जास्त धान्य हवं होतं तर जास्त मुलं जन्माला घालायला हवी होती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

त्या नाराज नेत्यांनाही खुर्शीद यांनी दिली सल्ला

माजी केंद्रीय मंत्री असणारे खुर्शीद यांनी मागील काही काळापासून काँग्रेसवर नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही सल्ला दिला आहे. ज्या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी सध्या स्वत:च स्थान शोधण्याऐवजी इतिहासामध्ये त्यांची दखल कशी घेतली जाईल यासंदर्भात विचार करण्याची गरज आहे, असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासंदर्भातील नाराजी व्यक्त केली होती. याचनंतर खुर्शीद यांनी नाराज नेत्यांना स्पष्ट शब्दांमध्ये आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय. सध्या काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडल्याचं चित्र असून खुर्शीद हे केंद्रीय नेतृत्वाला समर्थन करणाऱ्या गटातील नेते आहेत.