दिल्ली पोलीस आता पोलीस स्थानकांत येणाऱ्या तक्रारकर्त्यांचं आदरातिथ्य करताना दिसणार आहेत. एखादा व्यक्ती तक्रार करण्यासाठी आल्यास त्याला दिल्ली पोलीस आता चहापाण्याची विचारणा करताना दिसतील. कारण, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांचे चांगले आदरातिथ्य करा, त्यांच्याशी विनम्रतेने वागा असा सल्ला दिल्ली पोलिसांना दिला आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस स्थानकांत चहाचे स्टॉल लावण्यासही सिंह यांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, जेव्हा एखादा व्यक्ती तक्रार करण्यासाठी येतो त्यावेळी त्याच्याशी विनम्रतेने नाही वागू शकत का? आपण त्यांना चहापाण्याबाबत विचारणा नाही करु शकत का? असे प्रश्न सिंह यांनी ‘300 पेट्रोलिंग बाइक’ या नव्या मोटारसायकलला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करताना विचारले. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित व्हावं यासाठी या बाईक दिल्ली पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना, जास्तीजास्त लोकांनी तक्रार दाखल करावी आणि दिल्ली पोलिसांबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून तक्रारकर्त्यांना चांगली वागणूक द्या अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्थानकात चहाचे स्टॉल लावावे असा सल्ला त्यांनी पोलीस आयुक्तांना दिला आहे.