News Flash

“तुम्ही लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये…”; भूमिपूजनाच्या ट्विटवरुन प्रियंका यांना ओवेसींचा टोला

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भातील पोस्टवरुन ओवेसींनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला २४ तासांहून कमी कालावधी शिल्लक असतानाच देशातील राजकीय वातावरण मात्र यावरुन तापू लागलं आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली. त्यातच आता एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीद प्रकरणावरुन आता थेट  काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुनावले आहे. “लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा असा,” असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटवरुन राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात एक पत्रक ट्विटवरुन पोस्ट केलं. यामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्र आणि सिता मातेचे मंदिर उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव आणि संस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारा असेल अशी कॅप्शन देत त्यांनी हे पत्रक पोस्ट केलं आहे. या पत्रकामध्ये प्रियंका यांनी, “रामायणाच्या माध्यमातून आपल्याला धर्म, कर्तव्याबद्दलची निष्ठा, प्रेम, त्याग, पराक्रम, सेवाभाव यासारख्या अनेक गोष्टींची शिकवण मिळते. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणपासून उत्तरेपर्यंत रामकथा सर्वांना प्रेरणा देत आली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे असून त्यांना सर्वांचे कल्याण अपेक्षित आहे. त्यामुळेच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत,” असं म्हटलं आहे. याच पत्रकात त्यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रियंका यांच्या याच ट्विटवरुन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “आनंद आहे की ते (काँग्रेस) आता दिखावा करत नाहीय. जर त्यांना प्रखर हिंदुत्वावाद्यांची बाजू घ्याची असेल तर आमची काहीच हरकत नाही. मात्र ते करताना ही बंधुभावासंदर्भातील उथळ वक्तव्य का करावीत? (तुम्ही) लाजू नका, कृपया आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा,” असं ओवेसी यांनी प्रियंका यांच्या ट्विटवर प्रितिक्रिया देताना म्हटलं आहे.

मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची घोषणा आठवड्याभरापूर्वी करण्यात आली त्यावेळीही ओवेसी यांनी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे हे संविधानाच्या शपथेच्या विरोधात असल्याची टीका केली होती. “पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटानं १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवेसी म्हणाले होते.

भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसंदर्भातील एका चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वीच मी जिवंत असेपर्यंत अयोध्या हा मुद्दा सोडणार नाही असंही म्हटलं होतं “कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. परंतु, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना आणि भारतातील लोकांनाही, ज्या बहुसंख्य लोकांचा न्यायावर विश्वास आहे. त्यांना सांगेल की, तिथे एक मशीद होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ती पाडली गेली. जर मशीद पाडली गेली नसती, तर हा कार्यक्रम (राम मंदिर भूमिपूजन) आयोजित करताच आला नसता,” अशी टीका ओवेसी यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:07 pm

Web Title: be proud of congress party contributions to the movement that demolished babri masjid asaduddin owaisi slams priyanka gandhi vadra scsg 91
Next Stories
1 “आज राजीव गांधी असते तर…”; भूमिपूजनाच्या निमित्तानं कमलनाथांना झाली आठवण
2 पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती
3 प्रवासी वाहतुकीसाठी सुपरसॉनिक विमानाचा प्लान, व्हर्जिन गलॅक्टिक आणि रोल्स रॉयस आले एकत्र
Just Now!
X