देशाचा गुन्हेगार असलेला फरार मद्यसम्राट विजय मल्ल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला केंद्रीय आदिवासी मंत्री आणि भाजपा नेते ज्युएल ओराम यांनी आदिवासी बांधवांना दिला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हैदराबादमध्ये पहिल्या राष्ट्रीय जनजातीय उद्यमी संमेलनात ज्युएल ओराम आदिवासी समाजातील लोकांना संबोधित करीत होते. यावेळी उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करताना केवळ हार्ड वर्कर बनू नका तर स्मार्ट वर्कर बना असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी विजय मल्ल्याचे उदाहरण दिले. मल्ल्या वाईट कामांमध्ये अडकण्यापूर्वी एक यशस्वी व्यवसायिक होता त्यामुळे त्याच्या या यशाने प्रेरित व्हायला हवे असे ओराम म्हणाले. या कार्यक्रमात १००० हून अधिक आदिवासी उपस्थित होते.

ओराम म्हणाले, तुम्ही वियम मल्ल्याला शिव्या देता. मात्र, मल्ल्या कोण आहे? तो एक कुशल आणि स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने काही बुद्धिमान लोकांना आपल्याकडे कामावर ठेवले आणि त्यानंतर बँका, राजकारणी आणि सरकार यांना आपल्या प्रभावाखाली आणले. असे करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही. आदिवासींना कोणी सांगितले आहे का, की त्यांनी व्यवस्थेवर आपला प्रभाव टाकू नये. तुम्हाला कोणी बँकांवर आपला प्रभाव टाकण्यापासून रोखले आहे का?

या संमेलनात ओराम म्हणाले, आदिवासी होण्याचे काही नुकसानही आहे तर काही फायदेही आहेत. जसे की, आदिवासींसाठी शैक्षणिक संस्था तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सोय आहे. ते याचा लाभ घेऊन आपले जीवन चांगले बनवू शकतात. तसेच आदिवासी होण्याचे नुकसान हे आहे की, जर कोणी आपल्या जीवनात यशस्वी झाला तरी त्याला ओळख मिळत नाही. त्यांच्या यशाला देखील लोक आरक्षणाशी जोडू पाहतात. यामुळे त्यांच्यासोबत लोक भेदभाव करतात. त्यामुळेच अनेक आदिवासी आपले आडनावही आता उघड करीत नाहीत.

यावेळी तेलंगाणाचे अर्थमंत्री इटाला राजेंद्र म्हणाले, बँका आदिवासींसोबत भेदभाव करतात. त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, असे होता कामा नये यासाठी बँकांनी आपल्या धोरणांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.