पाकिस्तानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदाराने दाढी ठेवलेली नसल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, ही विरोधी उमेदवाराची मागणी फेटाळून पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदाराचा अर्ज स्वीकारला.
सत्तारूढ पीएमएल-एन पक्षाने ममनून हुसेन यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून उमेदवारी अर्जाची छाननी करताना ममनून त्यांनी दाढी ठेवलेली नसल्याचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर आला. ममनून हुसेन यांनी दाढी ठेवली नसल्याने ते इस्लामी देशाचे प्रमुख होण्यास अपात्र आहेत, अशी हरकत अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील विरोधी उमेदवार झहूर हुसेन यांनी घेतली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या परंपरांचे हे उल्लंघन आहे. उमेदवाराने इस्लामच्या परंपरांचे पालन केले पाहिजे, असे घटनेत नमूद करण्यात आले आहे, असेही झहूर हुसेन म्हणाले.
तथापि, निवडणूक आयोगाने झहूर यांची हरकत फेटाळून ममनून हुसेन यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती वजिहुद्दीन अहमद यांचा उमेदवारी अर्ज आयोगाने स्वीकारला आहे. अन्य पाच अपक्ष उमेदवारांच्या अर्जावर एकाही लोकप्रतिनिधीची सही नसल्याने ते फेटाळण्यात आले.