गायींची तस्करी करणाऱ्यांना मारा पण त्यांची हाडे तोडू नका. जेणेकरून पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असा सल्ला विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गोरक्षकांना दिला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील ब्रज आणि उत्तराखंड परिसरातील विहिंपच्या नेत्यांनी ‘ मारा पण हाडे तोडू नका’ ही पळवाट सुचविल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गोरक्षक विभागाच्या केंद्रीय समितीचे सदस्य खेमचंद यांनी विहिंपचे सदस्य नसलेल्यांनीही गायींच्या तस्करीचा व्यापार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आपण कायदा हातात घेता कामा नये. मी अनेकदा कार्यकर्त्यांना सांगतो, मारा पण हाडे तोडू नका. एखाद्याची हाडे तोडली तर पोलिसांच्या कारवाईचा धोका असतो. काही लोक गायींच्या तस्करांना मारतानाचा व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याची काही गरज नाही, असे मत खेमचंद यांनी मांडले.
गायींची तस्करी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे आणि जेव्हा तस्करी करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा गोरक्षक सैनिकांचा त्यांना सामना करावा लागेल’, असेदेखील खेमचंद यांनी सांगितले. खेमचंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाची सुरक्षा ‘मेक इन इंडिया’ नाही तरगो रक्षणामुळेच होणार असल्याचा दावा केला.
नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर होण्या-या हल्ल्यांविषयी भाष्य केले होते. तथाकथित गोरक्षकांपैकी बहुतांश लोक ‘समाजकंटक’ असून ते गोरक्षणाच्या नावावर दुकानदारी चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी या लोकांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर मोदी यांनी गोरक्षकांचा अपमान केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला होता. हा केवळ गोमातेचाच नव्हे, तर हिंदूंचा अपमान असल्याचे तोगडियांनी म्हटले होते. मात्र, पंतप्रधानांवर अशाप्रकारची जाहीर टीका करणे टाळावे, असे सांगत भागवत यांनी भाजप आणि हिंदू संघटनांमध्ये एकप्रकारे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.