उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये २१ जणांना अटक
दादरी प्रकरणाचा तणाव अद्याप निवळला नसताना उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये गोहत्या अफवेमुळे आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारात पोलिसांची वाहने, दुकाने यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून सात पोलीस जखमी झाले आहेत.
या दंगली प्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली असून एका मंडल अधिकाऱ्याला हलगर्जीपणामुळे निलंबित करण्यात आले आहे. कारहाल भागात काही लोकांनी गोहत्येची अफवा पसरविल्यामुळे दंगलीला सुरुवात झाली, असे शासकीय प्रवक्त्याने सांगितले आहे. मृत गाईचा शवविच्छेदन अहवाल मिळाला असून आजारपणामुळे गाईचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पसरलेल्या अफवेमुळे नगरिया गावातील लोकांनी हिंसक निदर्शने करताना पोलिसांच्या वाहनाला आग लावली. तर अन्य वाहने आणि दुकानांची तोडफोड केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. गाईची हत्या करून तिचे कातडे काढल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला, असे पोलिसांनी सांगितले.
गोहत्येची अफवा पसरल्यामुळे गाईचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर गाईचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा न्यायदंडाधिकारी चंद्रपाल सिंह यांनी दिली. अफवा पसरविणाऱ्या गावकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाईचे कातडे काढणाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच, हिंसा करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दंगलीप्रकरणी अद्याप २५० जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. या सर्वाचा दंगलीत सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले.
गायीचा काही काळापूर्वीच नैसर्गिकरीत्या अंत झाला होता. ती गाय काही लोकांनी गावाबाहेर नेऊन तिची कातडी सोलण्यास सुरुवात केली. मृत जनावरांची कातडी काढण्याचे काम येथे नेहमीच चालते. परंतु काही लोकांनी गायीची हत्या करण्यात आल्याची अफवा पसरवली आणि या भागात तणाव पसरला. या भागांतील नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले, असे जिल्हा दंडाधिकारी सिंह यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 1:16 am