पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी जवळपास पूर्ण दिवस या तळावरच वापराविना पडून असलेल्या लष्करी अभियांत्रिकी सेवा विभागाच्या शेडमध्ये काढल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या कामी त्यांना हल्ल्याची आखणी करण्यासाठी तळाची पाहणी करून गेलेल्या दहशतवाद्यांची मदत मिळाली असावी, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.
भंगारात काढण्यात आलेली ही शेड निरुपयोगी साधने ठेवण्यासाठी वापरली जाते. त्या ठिकाणी तळावरील कर्मचाऱ्यांचीही वर्दळ नसते. याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी शेडचे कुलूप तोडून तिला आपले निवासस्थान बनविले. त्यांनी या शेडमध्ये जेवणही केल्याचे पुरावे समोर आले आहेत.
तसेच, येथील सामानाची हलवाहलव करत त्यांनी झोप घेण्यासाठी पुरेशी जागा केल्याचेही दिसले. त्यामुळे दिवसभर आराम करून या दहशतवाद्यांनी अंधार होण्याची वाट पाहिली व पहारेकऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्याच्या सुमारास त्यांनी तळावर प्रवेश केला, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे या सूत्रांनी सांगितले.
टेहळणी यंत्रणांनी हेरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला व त्यात पाच जवान मारले गेले, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असलेले पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग हे तपासात सहकार्य करत आहेत. त्यांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचा कुठलाही दुवा मिळू शकलेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 3:33 am